
महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिकीट नाकारल्यामुळे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करीत राडा घातला. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी भाजप-मिंधे गटाची युती झाली असून सिल्लोड-सोयगावच्या 11 जागा वगळता भाजप 27 तर मिंधे गट 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच राडा केला. युती तोडा म्हणत मंत्री सावे, कराड यांना घेराव घालून त्यांची वाहने अडवली. अखेर पोलिसांनी कडे करून मंत्र्यांसह खासदार, आमदारांची सुटका केली.
शहरातील कोकणवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये आज मंगळवारी दुपारी 2 वाजेपासून भाजप आणि मिंधे गटाची जिल्हा परिषदेत युती करण्याबाबत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर जागावाटपाची घोषणा होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली. मंत्री अतुल सावे व खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी वैजापूरसाठी युती तोडा अशा जोरदार घोषणा देत त्यांची गाडी अडवली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मिंधे गटात अंतर्गत वाद उफाळून आला होता, तसाच सूर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दिसून आला आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र युतीबाबत नाराजी स्पष्टपणे जाणवली. जागा वाटपात वैजापूर तालुक्याच्या दृष्टीने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत युतीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी या वेळी केली.
आमच्यावर अन्याय झाला!
वैजापूर तालुक्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे, त्यामुळे किमान आम्हाला चार ते पाच जिल्हा परिषदेचे गट देणे अपेक्षित होते. मात्र आम्हाला केवळ तीन जिल्हा परिषदेचे गट दिल्याने आमच्यावर हा अन्याय आहे, असा एकमुखी सूर कार्यकर्त्यांनी या वेळी लगावला. वैजापूर तालुक्यातील शिरूर, महालगाव आणि वाकला हे गट भाजपला देण्यात आले आहेत. मात्र सवंदगाव आणि लासूर जिल्हा परिषदेचा गट आम्हाला द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.





























































