
कुर्ला पश्चिममधील 71 बेकायदा बांधकामांवर पालिकेने बुलडोझर चालवत पाडकामाची कारवाई केली. पालिकेच्या ‘एल’ वॉर्डकडून करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील दुकाने आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
कुर्ला पश्चिम येथील कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार परिसर, विनोबा भावे नगर आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे अशा एकूण 71 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कुर्ला पोलीस ठाणे हद्दीतील 53 आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाणे हद्दीतील 18 असे एकूण 71 अनधिकृत फेरीवाले, दुकाने व दुकानांचे वाढीव बांधकाम यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे 46 अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



























































