
एकीकडे मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिला असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीच या अभिजात दर्जाचा अपमान करीत असल्याचे दिसून आले आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने वाहतूक नियंत्रणाबाबतची अधिसूचना चक्क गुजराती भाषेत काढल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला गुजराती भाषेचा एवढा कळवळा का असाही प्रश्न तमाम मराठी प्रेमींनी विचारला आहे.
मुंबई – अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग सोमवारी व आज मुंबईच्या दिशेने जाणाऱया अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याची माहिती देण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढली. मराठी आणि हिंदी मध्ये त्याचा मजकूर होता. पण गरज नसताना गुजराती भाषेतूनहीही अधिसूचना जारी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारवाई करा
पालघरला लागूनच असलेल्या गुजरातच्या हद्दीमध्ये तेथील सरकार स्थानिक मराठी माणसांवर वारंवार अन्याय करीत आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना मात्र गुजराती भाषेचा पुळका आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तमाम मराठी प्रेमींनी केली आहे.
सोशल मीडियावर स्टेटस
मुंबई-अहमदाबाद मार्गावरून उत्तर हिंदुस्थानमधील विविध राज्यांची वाहने मुंबईत नेहमी येत असतात. यासंदर्भात वाहतुकीचे नियंत्रण करणाऱया अधिसूचना यापूर्वीही काढण्यात आल्या, पण प्रथमच गुजराती भाषेतला महत्त्व दिल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांनीच गुजराती भाषेमधील अधिसूचनांचे हे पत्रक सोशल मीडियावर आपल्या स्टेटसद्वारे प्रसारित केल्याने संतापामध्ये आणखी भर पडली आहे.




























































