
आसाममधील कोक्राझार जिल्हय़ात पुन्हा हिंसाचार भडकला आहे. सोमवारी झालेल्या मॉब लिंचिंगमध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर आज मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. बोडो समुदाय आणि आदिवासींमध्ये संघर्ष झाला. दोन्ही समुदायांनी घरे आणि करिगाव पोलीस चौकीला आग लावली.
सोमवारी रात्री करिगाव चौकीजवळ मानसिंह रोडवर एका गाडीने आदिवासी समुदायाच्या दोन लोकांना धडक दिली होती. गाडीत बोडो समुदायाचे तीन लोक होते. अपघातानंतर गाडीतील लोकांना आजूबाजूच्या आदिवासी ग्रामस्थांनी मारहाण केली आणि गाडीला आग लावली. त्यात सिखना ज्वह्वलाओ बिस्मित याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज बोडो समुदाय आणि आदिवासींमध्ये संघर्ष पेटला.



























































