
अमेरिकन डॉलरसमोर हिंदुस्थानच्या रुपयाने सपशेल लोटांगण घातले आहे. आज 91 रुपये प्रति डॉलर ही सर्वकालीन नीचांकी पातळीवर रुपयाने गाठली. रुपया 90.97 रुपये प्रति डॉलर या नीचांकी पातळीवर आज बंद झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचे टेन्शन वाढवल्यामुळे घाबरलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठय़ा प्रमाणात पैसा काढण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम हिंदुस्थानच्या चलनावरही झाला आहे. रुपया नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे आयात महाग होणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपया प्रचंड दबावाखाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रुपयाने प्रथमच 91 ची पातळी ओलांडली होती. त्यानंतर जेमतेम महिनाभरात रुपया पुन्हा 91 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. दिवसभरात रुपयाने 91.06 ही नीचांकी पातळी गाठली होती. आरबीआयने हस्तक्षेप केल्यानंतर रुपयाची आणखी पडझड थांबली. त्यापूर्वी 16 डिसेंबर 2025 रोजी रुपयाने 91.14 या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. रुपयाच्या घसरणीमुळे परदेशातील विद्यार्थ्यांचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय कच्चे तेल व इतर वस्तूंच्या आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
रुपया घसरण्याची प्रमुख कारणे
डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर टॅरिफ लावले आहे. त्यातच ट्रम्प यांनी ग्रीनलँड बळकावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे युरोप आणि आशियातील देशांचे धाबे दणाणले आहे. अशा भीतीदायक परिस्थितीत गुंतवणूकदार आपले पैसे भारतासारख्या विकसनशील देशांमधून काढून अमेरिकन डॉलरमध्ये किंवा सोन्यात गुंतवू लागले आहेत. तसेच अमेरिकेत व्याजदर अजूनही जास्त आहेत. जास्त नफा कमावण्यासाठी गुंतवणूकदार आपले पैसे अमेरिकन बँका आणि बॉण्डस्मध्ये टाकत आहेत. त्यामुळे जगभरात डॉलरची ताकद वाढली आहे.






























































