
देशात आधीच महागाईने हैराण झालेल्या लोकांना आता आणखी जबर धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शंभरी गाठली असताना आता वाहन चालवणे आवाक्याबाहेर होणार आहे. वाहनांचे टायर व स्पेअर पार्टस्सोबत इंजिन ऑईलच्या किमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाहनांचे इंजिन ऑईल, स्पेयर पार्टस् आणि टायरच्या किमती वाढल्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले जाणार आहे. यामुळे गाड्यांचे मेंटेनन्स करणे आता आवाक्याबाहेर जाणार आहे.
कार आणि दुचाकीचे स्पेयर पार्टस् 10 ते 15 टक्के आणि टायर्सच्या किमतीत 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कच्चे मटेरियल महाग झाल्याने वाहनांच्या स्पेयर्सच्या किमतीत ही वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दुचाकीची वाहन क्लच प्लेट आधी 400 रुपयांना होती. ती आता 460 ते 780 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 800 रुपयांना मिळणार पिस्टन आता 875 रुपयांना मिळणार आहे. गाड्यांचे चेन स्प्रोकेट सेट आता 650 ते 875 रुपयांपर्यंत वाढला आहे. दुचाकी आणि कारच्या इंजिन ऑईलमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही कंपनीचे इंजिन ऑईल 350 ते 450 रुपये किमतीला विकले जात आहे.
स्प्लेंडरचे टायर आधी 1500 रुपयांना मिळत होते, परंतु आता याची किंमत 1700 रुपयांपासून सुरू होत आहे, तर मोपेड वाहनांच्या टायरची किंमत वाढून 1300 रुपयांच्या वर गेली आहे. कार एसेसरीजमधील 400 रुपयांना मिळणारा व्हिल कव्हर आता 500 रुपयांना मिळत आहे. सीट कव्हरची किंमतही वाढली आहे. 100 ग्रॅम गिरीसच्या डब्ब्याची किंमत 25 रुपयांच्या पुढे गेली आहे. वाहनाला झाकून ठेवणारे कव्हरसुद्धा महाग झाले आहे. याआधी कारचे कव्हर 400 ते 500 रुपयांना मिळत होते. त्याची किंमत आता 700 रुपये झाली आहे. लक्झरी कारची किंमत अडीच हजार रुपये झाली आहे.





























































