
जगप्रसिद्ध तिरुमाला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेशात 5 हजार मंदिरे बांधणार आहे. ही मंदिरे बांधण्यासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम श्री वाणी ट्रस्टच्या निधीचा वापर करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये बांधण्यात येणाऱ्या मंदिरांमधून भक्ती आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद तिरुमाला तिरुपती देवस्थानला आहे. या मंदिरात भजन-कीर्तन करण्यासाठी सुविधा निर्माण केली जाणार आहे.
तिरुपती देवस्थानने दोन हजार मंदिरे बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्या मंदिरांसाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपये खर्च होणार होते. त्यामधील 1,400 मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले असून 600 मंदिरांचे काम सुरू आहे. आता 5 हजारांहून अधिक मंदिरे बांधण्याची योजना तिरुमाला तिरुपती देवस्थानमने आखली आहे. आंध्र प्रदेशातील गाव, कॉलनी आणि वस्त्यांमध्ये असलेला भूखंड पाहून मंदिरे बांधण्यासाठी निधी दिला जाणार आहे. जवळपास 2178 वर्ग फूट जागेसाठी 10 लाख रुपये, 3484.8 वर्ग फूट जागेसाठी 15 लाख रुपये तर त्याहून अधिक जागा असल्यास 20 लाख रुपये मंदिर बांधकामासाठी दिले जाणार आहेत. नवीन बांधण्यात येणाऱ्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भिंत आणि सजावट करण्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी निर्देश दिले आहेत. त्यासाठी किमान 5 ते 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
कोण करू शकतो अर्ज?
ज्या गावाला मंदिर बांधायचे आहे, त्या गावाने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गावात किंवा वसाहतीत मंदिर बांधू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती, गट किंवा समिती देणगी विभाग आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. मंत्री, खासदार, आमदार आणि एमएलसी यांच्या शिफारशींद्वारेदेखील अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. https://endowmentsinfo.ap.gov.in/ttdbhajanamandirams या वेबसाइटवर करता येईल.





























































