
>> प्रभाकर पवार
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कल्याण येथे राहणारे “व मुंबईच्या सहार वाहतूक शाखेत कार्यरत असणारे देविदास हितारसिंग सस्ते हे पोलीस हवालदार आपली दिवसभराची ड्युटी संपवून सायंकाळच्या सुमारास कल्याण लोकलने घरी जात असताना मुलुंड येथे गर्दीत त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले व रेल्वे रुळाखाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याआधी दहिसर पोलीस ठाण्याच्या एका सुरक्षा रक्षकाचा (MSF) लोकलने प्रवास करीत असताना गोरेगाव येथे रेल्वे रुळाखाली येऊन अंत झाला होता. मुंबई पोलीस दलातील अर्धेअधिक पोलीस, शिपाई व कर्मचारी मुंबईबाहेरील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, वसई-विरार आदी ठिकाणी राहतात व दररोज मुंबईत लोकलने ये-जा करीत असतात. त्या वेळी गर्दीतून चढता-उतरताना काहींचा तोल जाऊन ते खाली पडतात आणि रेल्वे रुळाखाली येऊन त्यांचा मृत्यू होतो. मुंबई पोलीस दलातील पोलिसांचे रेल्वे रुळाखाली येऊन अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
रोज पहाटे चार-पाच वाजता घरातून बाहेर पडणे, लोकलमधील गर्दीत जीव मुठीत धरून प्रवास करणे व ड्युटी संपल्यावर पुन्हा जीवघेणा प्रवास करणे हे आता नित्याचे झाले आहे. ‘लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू’ ही दोन ओळींची बातमी वर्तमानपत्रात अधूनमधून छापून येते. परंतु या अपघाती मृत्यूचे कारण मात्र कुणी शोधत नाही. पोलीस शिपाई हा मुंबई पोलीस दलाचा खरा कणा आहे. परंतु हाच कणा रोज जीव मुठीत धरून लांब पल्ल्याचा प्रवास करीत आहे. कारण काय तर मुंबईत घर नाही, पुरेशा शासकीय वसाहती नाहीत, परवडणारी घरे नाहीत. त्यामुळे त्य त्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मंत्र्यांना, बड्या अधिकाऱ्यांना शहरात गाडी, बंगले व मोठी ऐसपैस घरे मिळतात, अनधिकृत झोपडपट्टीवासीयांचे, परप्रांतीयांचे पक्की घरं देऊन पुनर्वसन केले जाते. परंतु साध्या पोलीस शिपायांना ५०० फुटांचे साधे घर मिळत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
ब्रिटिश काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस जवळ हवेत म्हणून ब्रिटिशांनी पोलीस ठाण्याच्या वर व आजूबाजूला जाणीवपूर्वक क्वॉर्टर्स बांधल्या. कुलाबा, एमआरए, भायखळा, गावदेवी, डी.बी. मार्ग, दादर, भोईवाडा आदी पोलीस ठाण्यांच्या वर पहिल्या मजल्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या क्वॉर्टर्स आपणास आजही दिसून येतील. ब्रिटिश गेल्यानंतर नवीन पोलीस ठाण्यांना संलग्न घर किंवा क्वॉर्टर्स बांधल्या गेल्या नाहीत. ज्या वसाहती बांधल्या गेल्या त्या अपुऱ्या आहेत. मुंबई पोलीस दलात आज ५० हजारांच्या वर मनुष्यबळ आहे, परंतु त्यातील ६० टक्के पोलिसांना आज घरेच नाहीत.
मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी. २४ तास हे शहर धावते. या शहराच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून काम करणारा घटक म्हणजे मुंबई पोलीस. सर्वात कष्टकरी, परंतु आज तोच पोलीस आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी झगडत आहे. मुंबई पोलीस दलातील अंदाजे ४००-५०० पोलीस शिपाई घरासाठी दरमहा अर्ज करीत असतात. तरीही त्यांना घर मिळत नाही ही भयावह परिस्थिती आहे. पोलिसांची नोकरी मुंबईत आणि त्यांचे घर मुंबईबाहेर. प्रवासात पोलिसांचे रोज किमान ४ ते ५ तास खर्च होतात. असा हा थकलेला, झिजलेला पोलीस ना आपल्या कुटुंबीयांना समाधान देऊ शकत, ना पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्यांना संतुष्ट करू शकत. प्रवासात सारी शक्ती संपल्यावर त्यांच्यामध्ये कशी ऊर्जा शिल्लक राहील? लोकलमधून पडून मुंबईमध्ये सरासरी रोज किमान ८ ते १० रेल्वे प्रवाशांचे बळी जातात. त्यात आता मुंबईत काम करणाऱ्या, परंतु मुंबईबाहेर राहणाऱ्या पोलिसांची भर पडली आहे. याचा धसका पोलिसांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. सकाळी घरातून निघालेला व रेल्वे प्रवास करणारा पोलीस रात्री जिवंत घरी आला की, त्यांचा जीव भांड्यात पडतो.
या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “मुंबईत ड्युटी करणाऱ्या पोलिसाला मुंबईत घर नाही असे आता येथून पुढे होणार नाही. पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण संपवून बाहेर आलेला पोलीस शिपाई असो अथवा अधिकारी असो, मुंबईत ज्याची नियुक्ती होईल त्याला ताबडतोब निवास दिले जाईल. मुंबईत १०० पोलीस ठाणी असून त्याच्या जवळपास क्वॉर्टर्स बांधून दिली जाणार आहेत. मुंबईत ५० हजारांच्या वर मनुष्यबळ आहे. त्या सर्वांना घरे मिळणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला नुकतीच मंजुरीही देण्यात आली आहे. पोलिसांच्या या गृह प्रकल्पाला सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. कुलाब्यापासून ते मुलुंड दहिसरपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे असेही पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.
देवेन भारती यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हापासून त्यांनी मुंबई पोलिसांना घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिसांच्या गृह प्रकल्पाला कोणताही विलंब न लावता मंजुरी दिली. त्यातून मुख्यमंत्र्यांचा पोलिसांविषयी असलेला कळवळा दिसून येतो. येत्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांना ४० ते ४५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. आपला जीव धोक्यात घालून रोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पोलिसांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. आपल्या घरात नवीन व्यक्ती आली आणि काही चांगले सकारात्मक घडले की, आपण त्या व्यक्तीचा पायगुण चांगला आहे असे म्हणतो. देवेन भारती यांच्या बद्दलही मुंबई पोलीस दलात सध्या तसेच बोलले जात आहे.



























































