
गूगल मॅपवर रस्ता शोधणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. निर्माणाधीन पुलावरून दुचाकीसह 40 फूट खाली कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अन्य मित्र यात बचावले.
मध्य प्रदेशातील खंडवा येथे ही घटना घडली. जखमी तरुण खालवा येथून खरगोणकडे परतत होते. खंडवा येथे पोहचल्यानंतर त्यांनी गूगल मॅप चालू केला. गूगल मॅपने खंडवाला जाण्यासाठी दोन मार्ग दाखवले. एका मार्गावर ट्रॅफिक जॅम होते तर दुसरा रस्ता मोकळा होता. ते मोकळ्या रस्त्याने जायला निघाले. गूगल मॅप्सच्या मार्गदर्शनानुसार ते सिव्हिल लाईन्स परिसरातील बांधकामाधीन पुलावर पोहचले.
पुलावर कोणतेही मार्गदर्शक फलक लावले होते. अंधार असल्याने त्यांना पूल बांधकामाधीन असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पुलावर चढल्यानंतर दोघेही दुचाकीसह 40 फूट खाली कोसळले. अपघातात दोघेही गंभीर झाले. दुचाकी पडताना पाहून मागून येणाऱ्या मित्रांनी तात्काळ आपली दुचाकी थांबवली. यामुळे ते थोडक्यात बचावले. स्थानिकांच्या मदतीने मित्रांनी दोघांनाही तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले.



























































