
डोंबिवलीच्या नवनीतनगर संकुलातील एका सदनिकेत गॅस गळतीमुळे सोमवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाचजण होरपळले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की इमारतीतील काही घरांच्या खिडक्यांच्या काच्या फुटल्या तसेच अडीचशे मीटरपर्यंत हादरा बसला. हा धमाका नेमका कसला झाला या विचाराने अनेकांनी घरातून बाहेर पळ काढला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अक्षरशः भीतीचे वातावरण पसरले होते.
देसलेपाडा येथील नवनीतनगर संकुलातील डब्ल्यू विंगमधील ५१० क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये केतन देढिया राहतात. केतन हे बाराच्या सुमारास घरी आले. त्यांनी घरातील लाईट सुरू करताच गॅस गळतीमुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात केतन देढिया ५० टक्के होरपळले असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेजारी राहणारे मेहुल वासाड आणि विजय घोर हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या घरांचेही नुकसान झाले. केतन यांच्या घराची खिडकी व लोखंडी ग्रील तुटून थेट तळमजल्यावर कोसळली. याचवेळी तळाला राहणारे हरिश लोढाया आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा पार्श्व लोढाया हे बाहेर फेरफटका मारत असताना त्यांच्या अंगावर खिडकीच्या काचा पडल्या. त्यामुळे बाप-लेक दोघांनाही किरकोळ दुखापत झाली.
रहिवासी मदतीला धावले
सोसायटीतील रहिवाशांनी तत्काळ सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. केतन देढिया यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. स्फोटाची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गॅस गळती कशी झाली याचा अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.


























































