दिल्ली-मुंबई नव्हे तर बंगळुरू आहे महिलांसाठी सुरक्षित शहर

महिलांच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थानातील सर्वात सुरक्षित शहर कोणते याबाबत नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात दिल्ली-मुंबईला मागे टाकत दक्षिण हिंदुस्थानातील बंगळुरूने महिलांच्या सुरक्षेत अव्वल स्थान पटकावला आहे. वर्कप्लेस कल्चर कंसल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या महिलांसाठी सुरक्षित टॉप सिटीज चौथ्या अहवालात बंगळुरू नंबर वन ठरले आहे.

बंगळुरू महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात अनुकूल शहर ठरले आहे. बेंगळुरूला 53.29 चा शहर समावेश गुण मिळाला. येथे महिलांना केवळ सुरक्षितच वाटत नाही तर चांगल्या करिअर संधी आणि व्यावसायिक जीवन संतुलनाचा आनंद घेतात.

चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर

टीसीडब्ल्यूआय यादीत चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, सुरक्षा, सार्वजनिक सेवा, वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सामाजिक निकषांवर चेन्नईने सरस ठरली आहे. महिलांचा आर्थिक सहभाग आणि सुरक्षित वातावरणामुळे हे शहर सातत्याने चॉप रँकमध्ये येत आहे.

पुणे आणि हैदराबाद टॉप 5 मध्ये

महिला सुरक्षेत पुणे तिसऱ्या क्रमांकावर तर हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही शहरांमध्ये, महिलांसाठी गृहनिर्माण, रोजगार, सहभाग आणि उद्योग समर्थन आवश्यक मानले गेले. हैदराबादमध्ये महिलांना नोकऱ्या आणि कामाच्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत असल्याचे नोंदवले गेले.

मुंबई टॉप 5 मध्ये

या यादीत मुंबईचा समावेश पहिल्या टॉप 5 मध्ये असला तरी तो पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईत रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात असताना महागडे राहणीमान आणि कमकुवत पायाभूत सुविधा महिलांसाठी आव्हानात्मक असल्याचे अहवालात नोंदवले गेले.

एनसीआरमधील केवळ गुरुग्राम टॉप 10 मध्ये

दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राम नोकऱ्या भरपूर आहेत. पण सुरक्षितता, क्षमतेनुसार संधी आणि गतिशीलतेमध्ये ही सहरे मागे आहेत. वर्कप्लेस कल्चर कंसल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या अहवालात, एनसीआरमधील केवळ गुरुग्रामचा समावेश टॉप 10 शहरांमध्ये असून यावेळी तो सहाव्या क्रमांकावर आहे. तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत गुरुग्रामने तीन स्थानांनी झेप घेतली.

कोलकाता, अहमदाबाद आणि कोइम्बतूरचाही यादीत समावेश

महिला सुरक्षिततेच्या बाबतीत चांगली कामगिरी करत कोलकाता सातव्या क्रमांकावर आले आहे. तर अहमदाबाद आठव्या क्रमांकावर आहे, जिथे महिलांसाठी कौशल्य विकास आणि औद्योगिक समर्थन मजबूत मानले जात होते. कोइम्बतूर दहाव्या क्रमांकावर आहे, जिथे स्ट्रीटलाइट ऑडिटसारख्या उपक्रमांमुळे रात्री उशिरा काम आणि प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.

या अहवालात हिंदुस्थानातील 125 शहरांचा समावेश आहे. हे रँकिंग शहर समावेशन स्कोअरवर आधारित असून अहवालासाठी दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. सामाजिक समावेशनमध्ये स्कोअर म्हणजेच सुरक्षितता, राहणीमान सुलभता, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यासारख्या पॅरामीटर्सचा विचार केला जातो. औद्योगिक समावेशन स्कोअर महिलांसाठी नोकऱ्या, महिला-अनुकूल कंपन्या आणि करिअर समर्थन पॅरामीटर्सवर अवलंबून असतो.