
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येतो. मात्र अनेकवेळा बंदोबस्तांवरील पोलीस अंमलदार जागेवर उपस्थित नसतात. अशा टंगळमंगळ करणाऱ्या अंमलदारांवर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ए ‘आय’ वरून नजर राहणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बंदोबस्त ॲप तयार केले आहे. या ॲपवरून बंदोबस्त लावला जाणार आहे.बंदोबस्ताच्या ठिकाणावरून पोलीस इकडे-तिकडे गेल्यास तात्काळ त्या अंमलदाराचे रिपोटिंग होणार आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा पोलीस यंत्रणा हायटेक केली आहे. बंदोबस्तावर ॲपद्वारे नजर ठेवण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच आणि अभिनव प्रयोग आहे.हे बंदोबस्त ॲप रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे. हे बंदोबस्त ॲप लॉगीन केल्यावर त्या अंनलदाराचे ठिकाण वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पहाता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १ हजार ४८१ पोलीस हे बंदोबस्त ॲप वापरत आहेत.
ठिकाण सोडून गेल्यास अलर्ट
बंदोबस्ताचे ठिकाण सोडून पोलीस अंमलदार अन्य ठिकाणी गेल्यास त्याचा अलर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार आहे. यासंदर्भात आज जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांना प्रात्यक्षिक दाखवले.


























































