
नालासोपारा शहर आता एमडी, ब्राऊन शुगर, गांजा सप्लायचा अड्डा झाले असून शहराची वाटचाल नशेचा ‘उडता पंजाब’च्या मार्गाने सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेपाळचा गांजा नालासोपाऱ्यात विक्री करण्यासाठी आलेल्या तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ८० हजारांचा गांजा जप्त करण्यात आला.
नालासोपारा पूर्वेच्या रेहमतनगर परिसरात अमली पदार्थविरोधी कक्ष २ चे पथक गस्त घालत होते. याचदरम्यान तीन जण हातात बॅग होऊन जात असताना पोलिसांना दिसले. मात्र पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. घेतली असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी तीनही जणांना अटक केली. चाँद फकीर (२६), शाकीर फकीर (२६), रंजनकुमार साफी (३२) अशी अटक आरोपींची नाव असून त्यांच्याकडून एकूण १४ किलो ३७ ग्रॅम वजनाचा २ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्यांची चौकशी केली असता हा गांजा नेपाळ येथून नालासोपाऱ्यात विक्रीसाठी आणला असल्याची कबुली त्यांनी दिली. हा गांजा ते कुणाला विकायला आले होते याचा तपास तुळींज पोलीस करत आहेत.





























































