
उड्डाणानंतर दीड तासाने वैमानिकाने एटीएसला एक सिग्नल दिला आणि विमानतळावर खळबळ उडाली. यानंतर इंडिगोचे मुंबईला निघालेले विमान बँकॉकला माघारी वळवण्यात आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग करून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सचे 6E1060 या विमानाने बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावरून मुंबईसाठी बुधवारी रात्री 10.30 वाजता उड्डाण घेतले. विमान अंदमान समुद्र ओलांडून बंगालच्या उपसागरात प्रवेश करत असतानाच बँकॉक विमानतळ एटीसीला विमानाकडून स्क्वॉक 7700 सिग्नल मिळाला. स्क्वॉक 7700 हा आपत्कालीन सिग्नल असल्याने, बँकॉक एटीसीने पायलटला तात्काळ मघारी येण्याची सूचना केली. विमानतळ सूत्रांनुसार, इंडिगोने बँकॉक ते मुंबई या उड्डाणासाठी एअरबस तैनात केली.
विमानात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन कोड 7700 वापरला जातो. हा सिग्नल मिळाल्यानंतर एटीसी संबंधित विमानाला प्राधान्य देत सर्व आवश्यक व्यवस्था करते. खबरदारी म्हणून बँकॉक विमानतळावर अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकाला देखील सतर्क ठेवण्यात आले होते. बँकॉकमध्ये विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवून टर्मिनलवर नेण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.


























































