घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा, आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी घोडाझरी वन्यजीव अभयारण्य आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाण प्रकल्पांना तीव्र विरोध करत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या प्रकल्पांना रद्द करण्याची मागणी केली आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने (SBWL) चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी वन्यजीव अभयारण्याजवळील लोहारडोंगरी आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील मार्की-मांगली येथील खाण प्रकल्पांना मंजुरी दिली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या X पोस्टमध्ये या निर्णयाला ‘अत्यंत विनाशकारी’ म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, व्याघ्र कॉरिडॉरमध्ये खाणकामाला परवानगी देण्याचा हा निर्णय थांबवण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहीत हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राज्य वन्यजीव मंडळाने घोडाझरी वन्यजीव अभयारण्याजवळील लोहारडोंगरी आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील मार्की-मांगली येथील खाण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प ज्या जंगलांमध्ये आहेत, त्या जंगलांसाठी आणि त्या जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांसाठी अत्यंत हानिकारक आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्या मंत्रालयाच्या आदेशानुसार या जंगलांचे आणि तेथील वन्यजीवांचे संरक्षण करावे.”

पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अनियंत्रित पर्यावरणीय नुकसानीच्या तुलनेत, त्यातून अपेक्षित उत्पादन खूपच कमी आहे. शिवाय या प्रकल्पांमधून राज्याला मिळणारा संभाव्य महसूलही नगण्य आहे. माझ्या असेही निदर्शनास आले आहे की, राज्य वन्यजीव मंडळाच्या काही सदस्यांनी या प्रकल्पांबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना विरोध केला होता. परंतु दुर्दैवाने अध्यक्षांनी त्यांचा विरोध डावलला.”

ते म्हणाले की, “मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की, राष्ट्रीय वन्यजीव मंडळात हे प्रकल्प पुन्हा विचारात घेऊन ते फेटाळून लावावेत. आपल्या जंगलांचे आणि वन्यजीवांचे भविष्य आता तुमच्या हातात आहे. मला आशा आहे की, माझी ही विनंती दुर्लक्षित केली जाणार नाही.”