
>> दिव्या सौदागर, [email protected]
‘ग्रिफ किंवा तीव्र स्वरूपाचा शोक’ ही मानसिक अवस्था जी जवळच्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतर सुरु होते. यात जाणवणारे अपराधीपण हे शोकाच्या तीव्र भावनेतून आलेले असते. अशा वेळी गरज असते ती फक्त आयुष्यातील कटू वास्तव स्वीकारण्याची.
विराज; (नाव बदलले आहे) त्याचे वडील गेल्यानंतर खूपच गंभीर झाला होता. वडिलांची सरकारी नोकरी असल्याने नियमाप्रमाणे त्याच्या आईला त्यांच्या जागेवर भरती केलं गेलं. त्यामुळे आर्थिक भार थोडाफार हलका झाला. साधारण वर्षभरात विराजचं कुटुंब सावरलं. विराजही स्वतसाठी उत्तम पगाराची नोकरी शोधत होता. नोकरीसाठी मुलाखती देणं चालू होतंच. वडील गेल्यानंतर घरातला एकुलता एक पुरुष म्हणून तो स्वतकडे पाहत होता.
‘सध्या मी टॉफेलची तयारी करतोय. पण माझं तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. परीक्षा जेव्हा जवळ येते तेव्हा इतकं दडपण येतं की मी व्यवस्थित ती देऊ शकत नाही. आतापर्यंत 3 वेळा असं झालं.’ समुपदेशनाला आल्यानंतर विराज त्याची समस्या सांगत होता. त्याला जेव्हा एकाग्रता आणि ताणावरच्या उपचार पद्धती सांगितल्या गेल्या तेव्हा त्याला तात्पुरता फरक पडला पण नंतर त्याला एकाएकी उदास वाटायला लागलं. सगळं सुरळीत चालू असताना निरुत्साही वाटायला लागलं. तेव्हा मात्र विराज पुन्हा सतर्क झाला. ‘गेल्या काही दिवसांपासून मला छातीत भरून येतंय आणि लगेच रडावसं वाटतं. तो सत्रामध्ये बोलत होता. ‘तुला रडावसं वाटतं म्हणजे कुठली भीती वाटतेय का?’ असं विचारल्यानंतर लगेचच तो उत्तरला; ‘नाही. मला अपराधीपणाचं फीलिंग येतं. मला हल्ली बाबांची आठवण येत नाही. त्याचंच मला फार गिल्ट येतं. मी त्यांना विसरलो तर नाही ना असं वाटून स्वतलाच कसंतरी वाटतं.’, असं बोलून त्याने मान खाली घातली.
‘ग्रिफ किंवा तीव्र स्वरूपाचा शोक’ असं ज्या मानसिक अवस्थेला म्हटलं जातं जी जवळच्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतर सुरु होते त्या मानसिक अवस्थेतून विराज सध्या जात होता आणि त्याला आलेलं अपराधीपण हे शोकाच्या तीव्र अशा भावनेतूनच आलेलं होतं. विराजच्या कुटुंबाविषयी त्याच्या वडिलांविषयी अधिक जाणून घेताना असं लक्षात आलं की त्याचं कुटुंब हे अतिशय प्रेमळ, एकमेकांची काळजी घेणारं असं होतं. वडील हे विराजचे आदर्श होते ते आणि तोही त्यांचा लाडका होता. त्यांचं अचानक जाणं हे सर्वांनाच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. विशेषत विराज तर कोलमडून गेला होता पण त्याने त्यावेळी खंबीरपणा दाखवून घरच्यांना सांभाळलं.
‘सुरुवातीला बाबांच्या जाण्यानंतर मी रोज त्यांना मिस करायचो पण हल्ली त्यांची आठवण खूप कमी येते. मी त्यांना विसरत तर नाही ना? की मी रडलो नाही म्हणून ते मला आठवत नाहीत. मी बाबांना विसरणार तर नाही ना?’ विराजची प्रश्नांची सरबत्ती आता चालू झाली.
शोक आणि अपराधीपण ह्या दोन्ही गोष्टी बर्याचदा आघाताच्या प्रसंगांमध्ये अनुभवास येतात. ह्या भावना उत्पन्न होणं हे सामान्य आहे. तरीही काही व्यक्ती अपराधीपणाच्या भावनेनं खचून जाऊ शकतात. हे अपराधीपण ‘मी काही करू शकलो’ शकले नाही.’ इथपासून सुरु होते. आयुष्यात येणार्या टोकाच्या दुःखद प्रसंगांमध्ये (जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्या व्यक्तीचा विरह) आपण बर्याचदा मानसिकरित्या तयार नसतो. त्यावेळी ती आघाताची घटना घडून गेल्यावर त्याच घटनेची मानसिक मालिका पाहणे, त्यातील संवाद किंवा इतर व्यक्तींच्या भावनांची मनातल्या उजळणी करणे, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि शेवटचं असणं आठवत राहणे, त्यावेळी दुःखी होणे, निराश असणे हे काही दिवस, फार फार तर सहा महिने सामान्य असते. पण जर हे नैराश्य किंवा टोचणी जर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ असेल तर त्यासाठी समुपदेशन आणि मानसोपचार घेणं अत्यावश्यक ठरतं.
जेव्हा ही शोकात्म अवस्था व्यक्तींमध्ये घडत असते तेव्हा मेंदूमध्ये भावनांच्या स्रोत असलेल्या भागामध्ये बदल होऊन चिंता, भय किंवा दुःख अशा भावना तीव्र होऊ शकतात. त्यावेळी त्याच्या इतर भागांमध्येही बदल होत असतात. दुःखद घटनांमधून जेव्हा व्यक्ती जात असते तेव्हा नैराश्य, तणावाच्या संबंधित हार्मोन्स स्रवतात. त्यावेळी येणारी एक भावना ही ‘अपराधीपण’ही असू शकते. काही कालावधीनंतर जेव्हा मन कटू वास्तव स्वीकारत असतं तेव्हा झालेली हानी (मृत्यू) ह्या द्वंद्वामध्ये व्यक्ती अडकून बसते.
विराजच्या बाबतीत असंच काहीसं होत होतं. तो ‘वडिलांचं नसणं‘ भावनिकदृष्टय़ा स्वीकारू शकत नव्हता. हे सगळं सांगताना एका क्षणी विराजच्या डोळ्यात पाणी आलं आणि भरपूर रडला. मोकळा झाला.
ह्यापुढची पायरी होती ती म्हणजे त्याला शोकमग्न अवस्थेतून थेरपीच्या (ज्याला ग्रिफ काउन्सेलिंग म्हटलं जातं) माध्यमातून बाहेर काढणं. त्यासाठी त्याला त्याचा वेळ घेऊ दिला गेला. कारण; वरवर जरी तो वडिलांचं नसणं दाखवत होता तरी मनातून तो त्यांचं अस्तित्व आहे हे विसरत नव्हता. म्हणूनच त्याची मानसिक सरंक्षक प्रणाली (डिफेन्स मेकॅनिझम) तयार झाली जिथे त्या आठवणी ‘म्यूट’ झाल्या होत्या. त्या ‘अनम्यूट’ करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी; त्याने त्यावेळी वडील गेल्यानंतर काय विचार केलेले होते आणि आता ते नसताना नक्की काय विचार करत होता हे सगळं त्याच्याकडून जाणून घेताना आलेल्या दुःख, राग, हताशपणा, असहायता आणि ह्यातून उद्भवलेला ताण ह्या सगळ्या संमिश्र भावनांचे नियोजन त्याला सांगितले गेले.
व्यक्तीचं नसणं किंवा ती अचानक निघून जाणं हे वेदनादायी असतं. ती पोकळी भरून निघतही नाही. परंतु; ती नक्की सांधली जाऊ शकते. गरज असते ती फक्त आयुष्यतील हे कटू आणि वास्तव स्वीकारण्याची.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)






























































