
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात असला तरी या विमानतळावरून अदानी समूहाने सिडकोला गायब केले आहे. एकाही ठिकाणी सिडकोचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने विमानतळ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहारही केला असून त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर अदानी समूहाने दिलेले नाही. त्यामुळे सिडकोच्या नावाचा उल्लेख विमानतळावर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये सिडकोची भागीदारी २६ टक्के आहे. जागेच्या भूसंपादनापासून ते सपाटीकरणाचे काम सिडकोने पूर्ण केले आहे. या प्रकल्पावर सिडकोचा सुमारे तीन हजार कोटींचा खर्च झालेला आहे. विमानतळाच्या निर्मितीबाबत जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीबरोबर करारनामा झाला होता त्यावेळी सिडकोच्या नावाचा उल्लेख सुमारे अर्धा डझन ठिकाणी करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र विमानतळ सुरू होऊन आता महिना होत आला असला तरी विमानतळावर सिडकोच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिडकोच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विमानतळ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोच्या परिवहन आणि विमानतळ विभागाच्या महाव्यवस्थापक गीता पिल्लई यांनी व्यक्त केली आहे.
कंपनीला पाहिजे ९९ वर्षांचा करार
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीला ३० वर्षांच्या करारावर विमानतळ चालवण्यासाठी दिले आहे. त्यातील पहिली दहा वर्षे ही प्रायोगिकतत्त्वावर आहेत. जर या कालावधीत कंपनीचे काम चांगले समाधानकारक राहिले तरच पुढील २० वर्षे याच कंपनीला विमानतळ चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. मात्र विमानतळ व्यवस्थापन कंपनीकडून आता ९९ वर्षांच्या कराराची मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोचे अधिकारी चक्रावून गेले आहेत.
























































