डोंबिवलीत आनंद दिघे उद्यानाची दुरवस्था; नाल्याचे पाणी घुसल्याने दुर्गंधी, प्रशासनाचे दुर्लक्ष

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती २७जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र त्यांच्या स्मरणार्थ डोंबिवलीत उभारलेल्या आनंद दिघे उद्यानाकडे प्रशासनाने पुरते दुर्लक्ष केले आहे. या उद्यानाची देखभाल, दुरुस्ती न केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली असून नाल्याचे पाणी थेट याठिकाणी येत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याबाबत रहिवासी अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून धर्मवीरांची आठवण फक्त निवडणुकांमध्येच येते का, असा सवाल नागरिकांनी शिंदे गटाला केला आहे.

एमआयडीसी निवासी भागातील मॉडेल शाळेजवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान हे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून २००२ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ उभारले होते. त्यानंतर फक्त दोनवेळा आमदार आणि खासदार निधीतून या उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मात्र सध्या देखभाल, दुरुस्ती अभावी या उद्यानाची दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेकडून योग्य देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने शेजारी असलेल्या गटाराचे सांडपाणी या उद्यानात पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीच्या ठेकेदाराने बांधलेले गटार अर्धवट स्थितीत असल्याने ही दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तर आंदोलन करू!

उद्यानाच्या दुरवस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे व मंदार स्वर्गे यांनी केडीएमसी व एमआयडीसी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र ढिम्म प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने संतप्त शिवसैनिकांनी आनंद दिघे यांच्या जयंतीपूर्वी या उद्यानाची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.