त्री-मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा – 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात तीन दिवस वाहतुकीत बदल

साकेत-बाळकूम रोडवरील ग्लोबल हॉस्पिटल येथे त्री-मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ठाणे महानगरपालिका, दादा भगवान परिवार व महावीर जैन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे त्री-मंदिर उभारण्यात आले आहे. सोहळ्यादरम्यान मुंबई-नाशिक महामार्गासह परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी हे तीन दिवस वाहतुकीत बदल केले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून ३० जानेवारी रोजी सकाळी ७ ते १ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत मार्गावरील जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तशा अधिसूचना वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आल्या असून त्या सूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

कळवा क्रिक नाक्याकडून साकेतमार्गे बाळकूमकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना साकेत कॉम्प्लेक्सजवळील महालक्ष्मी मंदिर येथे ‘प्रवेश बंद’ आला आहे. या वाहनांनी महालक्ष्मी मंदिर येथून रूस्तमजी कटमार्गे इच्छितस्थळी जावे.

कशेळी-बाळकूममार्गे साकेतकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना बाळकूम नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. या वाहनांनी माजिवडा प्रभाग समिती चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

माजिवडा गाव – लोढा संकुलातून बाहेर पडणाऱ्या जड-अवजड वाहनांना लोढा संकुल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. या वाहनांनी बाळकूम नाका तसेच माजिवडा गोल्डन नाका येथून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन केले आहे.