
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासह देवदर्शन तसेच पर्यटनाला निघालेल्या चाकरमान्यांचा ऐन थंडीत चांगलाच घामटा निघाला. एकाच वेळी लाखो वाहने रस्त्यावर आल्याने मुंबई-पुणे महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिककोंडी झाली. तसेच सुट्ट्यांच्या आनंदालाही ‘ब्रेक’ लागला. बोरघाटात ६ किलोमीटरच्या रांगा लागल्या असल्याचे आज पाहायला मिळाले. अमृतांजन ब्रिज ते खोपोली बायपास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ४ तास लागल्याने वाहनचालक अक्षरशः वैतागले होते.
शनिवार, रविवार आणि सोमवार अशा ३ दिवस सलग सुट्ट्या आल्याने मुंबई, ठाणे तसेच शहरातील नागरिकांनी पर्यटनाचा बेत आखला. शनिवारी अनेकांना कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक होणार नाही या आशेने निघालेले
पर्यटक तर काही जणांनी कुटुंबासह देवदर्शनाचे नियोजन केले. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात अंडा पॉईंटजवळ तर वाहतुकीचा जांगडगुत्ता झालेला पाहायला मिळाला. घाटात तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच अवजड वाहनांकडून लेनची शिस्त पाळली न गेल्याने अनेक ठिकाणी वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर बोरघाटात तब्बल २५ वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली.
एसटी बंद पडल्याने कोंडीत भर
खोपोली गावातील शाहू महाराज सभागृहासमोर एसटी महामंडळाची बस बंद पडल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. शिळफाटा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सारसण तसेच पाली फाटा येथे इमॅजिका पार्कसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने हे दोन्ही मार्ग दुपार पर्यंत ठप्प झाले होते.
इंदापूर, माणगावमध्ये जांगडगुत्ता
रायगड जिल्ह्यातील इंदापूर तसेच माणगावमध्ये सकाळी वाहतुकीला ब्रेक लागला. या मार्गाच्या रस्त्यावरदेखील सहा किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळाल्या. हा जांगडगुत्ता दूर करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक तसेच महामार्ग पोलीस रस्त्यावर उतरले होते. दरम्यान उद्या सोमवारीदेखील मुंबईकडे जाताना अशीच परिस्थिती असणार अशी शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तवण्यात आला.


























































