रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – गोव्याला नमवीत महाराष्ट्र अव्वल स्थानी

यजमान महाराष्ट्राने गोवा संघावर ८ गडी राखून विजय मिळवित रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पहिल्या डावात ६ बळी टिपत फलंदाजीतही चमक दाखविणारा जलज सक्सेना या सामन्याचा मानकरी ठरला.

पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. गोव्याला २०९ धावांवर रोखल्यानंतर महाराष्ट्राने ३५० धावसंख्या उभारून पहिल्या डावात १४१ धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर अभिनव तजराणाची (१०९) शतकी खेळी आणि दर्शन मिसाळच्या (६५) अर्धशतकाच्या जोरावर गोव्याने दुसऱ्या डावात ९७ षटकांत २४८ धावसंख्या उभारून महाराष्ट्राला विजयासाठी १०८ धावांचे किरकोळ लक्ष्य दिले. जलज सक्सेनाने ५, तर हितेश वाळूजने ४ बळी टिपत गोव्याची दाणादाण उडविली.

महाराष्ट्राने केवळ २१.१ षटकांत २ बाद १०९ धावसंख्या उभारून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. यात पृथ्वी शॉ (१७), नीरज जोशी (२२), अर्शिन कुलकर्णी (नाबाद ५२) व सिद्धार्थ म्हात्रे (नाबाद १४) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. गोव्याकडून ललित यादव व दर्शन मिसाळ यांनी १-१ बळी टिपला.