
फिलिपिन्समध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. 350 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक फेरी बोट समुद्रात बुडाली आहे. दक्षिण फिलिपिन्समध्ये झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे, तर बोटीवरून 316 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती फिलिपिन्स कोस्ट गार्डाने दिली आहे.
कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही त्रिशा कर्स्टिन 3’ (MV Trisha Kerstin 3) ही प्रवासी बोट झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलोच्या दिशेने जात असताना सोमवारी पहाटे दीडच्या वाजता हा अपघात झाला. या जहाजाची प्रवासी क्षमता 352 होती. अपघाताच्या वेळी त्यावर 332 प्रवासी आणि 27 कर्मचारी उपस्थित होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
समुद्रातील पाणी शांत असल्याने शोध आणि बचाव मोहिमेला वेग आला आहे असून आतापर्यंत 316 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 28 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती कोस्ट गार्डचे कमांडर रोमेल दुवा यांनी दिली. तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले असून बचाव कार्यासाठी लष्करी विमाने आणि जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
बसिलन द्वीप प्रांताचे गव्हर्नर मुजीब हातामान यांनी फेसबुकवर या घटनेचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये वाचलेल्या प्रवाशांना बोटीतून बाहेर काढले जात असल्याचे दिसते. काहींना थर्मल ब्लँकेटमध्ये गुंडाळले होते, तर काहींना स्ट्रेचरवरून नेण्यात आले. बहुतेक वाचलेले प्रवासी सुखरूप आहेत, परंतु काही वृद्ध प्रवाशांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासली आहे. अधिकारी सध्या जहाजावरील प्रवाशांच्या मूळ यादीशी वाचलेल्या लोकांच्या नावांची पडताळणी करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.


























































