
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. ट्युशनसाठी घरातून निघालेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मृत विद्यार्थिनी लक्ष्मी अभय महाजन (15) आणि नयना विजय चौधरी या जनता हायस्कूल, साक्री येथे शिक्षण घेत होत्या. सोमवारी सकाळी दोघी ट्युशनसाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र त्या ट्युशनला पोहोचल्या नाहीत. ट्युशन शिक्षकांनी एका विद्यार्थ्यामार्फत ही माहिती घरी कळवल्यानंतर पालक व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी सुमारे 7.45 वाजता एका दुचाकीवर एक तरुण व दोन मुली ट्रिपल सीट जाताना दिसून आले. मात्र अंतर अधिक असल्याने वाहन क्रमांक व तरुणाची ओळख स्पष्ट होऊ शकली नाही. सकाळी 9 वा. गावाजवळील सोपान महादेव फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोघींच्या शाळेच्या बॅगा आढळून आल्याने संशय बळावला. तत्काळ विहिरीत शोधकार्य सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाणे व बाजारपेठ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील मुकेश कोळी यांनी विहिरीत उतरून सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर दुपारी 12 वाजता लक्ष्मी महाजन हिचा मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर तीन ते चार ‘बिलाई’च्या सहाय्याने शोध सुरू ठेवण्यात आला आणि साधारण पावणेदोनच्या सुमारास नयना चौधरी हिचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला.
पहिला मृतदेह बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली. जोपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढले जात नाहीत आणि आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महिला व पुरुषांनी मृतदेहांसमोर ठिय्या मांडला. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. रोहन नरेंद्र चौधरी याने ‘मी दोघींना विहिरीत ढकलले,’ अशी माहिती दिल्याचे समोर आले. त्या आधारे तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे.
घटनास्थळी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात येत होती. काही ग्रामस्थांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली. मात्र पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे दि. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले होते. तसेच लेझीम पथक व वाद्यवृंदात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थ, शाळा व आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आनंदात साजरा झालेला तो दिवस आणि आजची ही दुर्दैवी घटना यातील विरोधाभासाने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या घटनेमुळे साक्रीसह संपूर्ण भुसावळ तालुका शोकसागरात बुडाला असून दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.



























































