
मुंबई मराठी साहित्य संघ आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने 47 वे ‘महानगर साहित्य संमेलन’ शनिवार 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ‘मुंबई आणि मुंबईतील लोकल ट्रेन’ या आगळ्या विषयावर हे संमेलन होणार आहे. हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामी संमेलनाध्यक्ष, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील उद्घाटक आहेत. गिरगाव येथे साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात एकदिवसीय संमेलन रंगेल. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा तांबे स्वागताध्यक्ष असतील.
संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे, ‘मुंबई आणि मुंबईतील लोकल ट्रेन’ यावर दिवसभर विविध सादरीकरण होणार आहे. शाहीर निलेश जाधव यांच्या मुंबईच्या पोवाडय़ाने सकाळी 9 वाजता संमेलनास प्रारंभ होणार असून संकेत तांडेल लिखित ‘लोकल’ ही एकांकिकाही सादर होणार आहे. ‘आपली मुंबई खरेच बदलली आहे का?’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, महापालिका पुरातत्त्व खात्याचे माजी अधिकारी संजय सावंत आणि अरुण पुराणिक सहभागी होतील. गोविंद माडगावकर यांच्या मुंबईचे वर्णन आणि नितीन साळुंखे यांच्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकातील उताऱयांचे अभिवाचन दिग्दर्शक मंगेश सातपुते व सुप्रिया विनोद करतील.
मुंबईतील ‘खाद्य संस्कृती’वर संजीव साबडे आणि मुंबईतील वाचन संस्कृती यावर संपादक मुकेश माचकर यांचे गप्पाष्टक रंगणार आहे. संमेलनाचा समारोप लोकलमधील रिल स्टार सानिका कणसे हिच्या रेल्वे भजनांनी होईल. सर्वांना मुक्त प्रवेश असल्याचे साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी सांगितले.




























































