
विजयाची हॅटट्रिक आधीच साजरी झाली आहे, पण समाधानावर थांबण्याचे टीम इंडियाच्या स्वभावतच नाही. त्यामुळे हिंदुस्थानी संघ बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया चौथ्या टी-20 सामन्यातही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. मालिका खिशात टाकल्यानंतरही ढिलाई नको, हाच संघाचा स्पष्ट इशारा आहे. काही प्रयोग होण्याची शक्यता असली तरी विजयाचा चौकार ठोकण्याचा निर्धार मात्र पक्का आहे.
फलंदाजीत वादळ, गोलंदाजीत धार शोधण्याचा प्रयत्न
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे हिंदुस्थानने पहिले तीनही सामने जिंकत मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे, मात्र फिरकी विभागात अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची कामगिरी अपेक्षांवर खरी उतरलेली नाही. कुलदीपने दोन सामन्यांत दोनच विकेट घेतले आहेत. त्याला धावा रोखण्यातही फारसे यश आल्यामुळे चौथ्या सामन्यात फिरकी आघाडीत बदल होण्याची शक्यता आहे.
संजूची कसोटी, अक्षरच्या तंदुरुस्तीवर नजर
या मालिकेत हिंदुस्थानसाठी चिंतेचा विषय ठरला आहे संजू सॅमसनचा फॉर्म. तीन सामन्यांत 10, 6, 0 अशा धावा केल्यामुळे त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तिलक वर्मा दुखापतीमुळे बाहेर असल्याने संजूला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. संघ व्यवस्थापन त्याला तिसऱया क्रमांकावर पाठवण्याचाही विचार करत आहे. दरम्यान, अक्षर पटेलच्या दुखापतीची स्थितीही निर्णायक ठरणार आहे.
न्यूझीलंडची गोलंदाजी अडचणीत
वन डेत चमकदार कामगिरी करणाऱया न्यूझीलंडसाठी टी-20 मालिकेत चित्र वेगळेच राहिले आहे. फलंदाजांनी अधूनमधून झुंज दिली, पण गोलंदाज हिंदुस्थानी आक्रमणापुढे पूर्णपणे हतबल ठरले आहेत. विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर धावा सहज निघत असल्याने न्यूझीलंडपुढे आणखी कठीण आव्हान उभे आहे.
संभाव्य संघ –
हिंदुस्थान – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा.
न्यूझीलंड – डेव्हन कॉनवे, टिम सीफर्ट, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सॅण्टनर, कायल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी.





























































