
महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या तिसऱया महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक स्पर्धेत गतविजेत्या सागर वाघमारेला अग्रमानांकन देण्यात आले असून उपविजेता महमद घुफ्रानला द्वितीय मानांकन लाभले आहे. येत्या 29 आणि 30 जानेवारीला होणाऱया या स्पर्धेत प्रथमच महिला आणि पुरुष एकाच गटात खेळणार आहेत. ही आकर्षक स्पर्धा दादर पूर्वेला श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉलमध्ये रंगणार आहे.
खुल्या गटात ही स्पर्धा खेळवण्यात असल्याने पुरुष व महिला प्रथमच एकत्रित या स्पर्धेत खेळणार आहेत. महाराष्ट्राशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, बंगाल, गोवा, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पुदुचेरी, ओडिशा व झारखंड अशा एकंदर 17 राज्यांतून खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच कॅनडा, श्रीलंका व मालदीव या देशातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना एकंदर आठ लाखांची रोख पुरस्कारांची उधळण केली जाणार असून विजेता दीड लाखाचा मानकरी ठरेल. उपविजेता एक लाख तर तिसऱया क्रमांकाला 75 हजारांचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत मोठया संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवावा म्हणून उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत खेळाडूंनाही दहा हजारांचे इनाम दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्याआधी पराभूत झालेल्या खेळाडूंनाही पाच हजारांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. याव्यतिरिक्त अनेक पुरस्कार दिले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत कॅरमपटूंची कसोटी लागणार हे निश्चित आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे, मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव्लेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होईल.




























































