
‘एआय’च्या मदतीने संगीतबद्ध केलेल्या ‘माझी मराठी-मराठी, माझी मराठी वाणी.. तिला माऊली मानलं गं ज्ञानोबा तुकोबांनी’ या गाण्याने सध्या शहापूरवासीयांची मने जिंकली आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त गीतकार-कवी प्राध्यापक गोपाळ वेखंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता माध्यमाचा प्रभावी वापर करून हे मराठी गौरव गीत तयार केले असून या गीताचे सूर शहापुरातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयात गुंजत आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून या भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि तिचे संवर्धन व्हावे यासाठी शासनाकडून राज्यभरात मराठी भाषा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार सर्व कार्यालये, मंडळ, महामंडळ, शैक्षणिक संस्थांमध्ये पंधरवडा साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे औचित्य साधून किन्हवली येथील शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. गोपाळ वेखंडे यांनी ‘एआय’च्या मदतीने ‘माझी मराठी-मराठी, माझी मराठी वाणी..’ हे गीत संगीतबद्ध करत तरुण पिढीसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
प्रा. गोपाळ वेखंडे हे गीतकार व कवी असून मुख्याध्यापक पदाव्यतिरिक्त त्यांना कविता करणे, गीत रचण्याची आवड आहे. त्यांनी २०१७ मध्येदेखील ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या अभियानावेळी तयार केलेले ‘झाडे लावूया साऱ्याजणी’ हे गीत खूप गाजले होते.





























































