
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी विमान दुर्घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे विमानाचे लँडिंग अयशस्वी झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा हे थोडक्यात बचावले आहेत. हे विमान दिल्लीहून जयपूरला जात होते.
एअर इंडियाचे विमान एआय-1719 ने दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावपट्टीवर उतरताच विमानाचे लँडिंग अयशस्वी झाले. खराब धावपट्टी किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे कळते. पहिल्या प्रयत्नात विमान उतरू शकले नाही. धावपट्टीला स्पर्श केल्यानंतर पायलटने लगेचच एक गो-अराउंड केला. 10 मिनिटे चक्कर मारल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. विमानात असलेले सुखजिंदर सिंग रंधावा सुरक्षित आहेत.
गो-अराउंड म्हणजे काय?
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या मानकांनुसार विमाने चालवताना अशा प्रकारची परिस्थिती येते. जर पायलटला कोणत्याही टप्प्यावर लँडिंग असुरक्षित वाटत असेल, तर तो विमान पुन्हा हवेत उचलण्याचा निर्णय घेऊ शकतो, ही प्रक्रिया गो-अराउंड म्हणून ओळखली जाते.




























































