एमएमआरडीएला हवीत शिवशाहीची 323 घरे, ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी केली मागणी

MMRDA Demands 323 Shivshahi Flats for Thane-Borivali Twin Tunnel Project Affected

ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे येथील झोपडीधारकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी गेल्या वर्षी एमएमआरडीएने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची संक्रमण शिबिरातील 323 घरे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. मात्र, या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ही घरे आम्हाला विकत द्या, अशी मागणी आता एमएमआरडीने शिवशाहीकडे केली आहे.

पश्चिम उपनगरवासीयांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी ठाण्यातील टिकूजीनी वाडी ते बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या दरम्यान 11.80 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मागाठाणे येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएने शिवशाहीकडून 323 घरे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. प्रत्येकी 300 चौरस फुटांची ही घरे कांदिवलीतील गणेशनगर, बाबरेकर नगर आणि दहिसर पश्चिमेला आहेत. या घरांसाठी शिवशाहीने 40 हजार रुपये डिपॉझिट आणि दरमहा आठ हजार रुपये भाडे एमएमआरडीएकडून घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी एमएमआरडीएने शिवशाहीकडे संक्रमण शिबिरातील घरे विकत मागितली आहेत. संक्रमण शिबिराची घरे विकत देता येतात का, याबाबत आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे अभिप्राय मागितला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यास आम्ही ही घरे एमएमआरडीएला विकत देऊ.

MMRDA Demands 323 Shivshahi Flats for Thane-Borivali Twin Tunnel Project Affected

MMRDA has requested to purchase 323 flats from Shivshahi Rehabilitation Project for the permanent resettlement of people affected by the Thane-Borivali Twin Tunnel project.