बा विठ्ठला! कोरोनाची लस लवकर तयार होऊ दे, अजित पवारांनी घातलेले साकडे

पंढरपूरची विठ्ठल रखमाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचं भावनिक नातं होतं त्या श्रद्धेतून त्यांनी पंढरपूर शहर विकास कामांसाठी आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.

पंढरीचा विठोबा हा गोरगरिब कष्टकऱ्यांचा देव आहे, इथे आलेल्या भाविकांना किमान मूलभूत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असायचा. अजितदादा त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले त्यांच्या कार्यकाळात त्यांना कार्तिकी वारीच्या शासकीय महापूजेची दोन वेळा संधी मिळाली. पहिली शासकीय महापूजा त्यांनी 2021 मध्ये आणि दुसरी 2022 मध्ये केली. यावेळी कोरोनाचा काळ होता तोंडाला मास्क लावून दादांसह त्यांचे कुटुंब श्री विठ्ठल रखुमाईच्या महापूजेत सहभागी झाले. महापूजेनंतर त्यांनी बा… विठ्ठला कोरोनाची लस लवकर निर्माण होऊ दे असे साकडे घातले होते.

2026 मध्ये होणारी कार्तिकी एकादशीची पूजा पुन्हा अजितदादांच्या हस्ते होणार हे जवळपास निश्चित होते पण नियतीला हे मान्य झाले नाही. काळाने त्यांना आधीच हिरावून घेतले.

जेव्हा जेव्हा अजितदादा पंढरपूर दौऱ्यावर आले तेव्हा तेव्हा पंढरपूर विकासासाठी त्यांनी भरभरुन दिले. अजितदादांच्या अकाली जाण्याने पंढरपूरकर आणि तमाम वारकरी संप्रदायाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.