‘द मॅट्रिक्स’मधील त्या पाच सेकंदांच्या सीनसाठी 27 वर्षांपूर्वी खर्च झाले होते 9 कोटी रुपये

सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक रक्ताचे पाणी करतात. कधी भव्य सेट, तर कधी तगडी स्टारकास्ट यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र, तब्बल 27 वर्षांपूर्वी एका हॉलिवूड दिग्दर्शकाने केवळ 5 सेकंदांच्या एका दृश्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून सर्वांना थक्क केले होते. आजच्या काळात 9 कोटींमध्ये एखादा संपूर्ण सिनेमा तयार होऊ शकतो, पण 1999 मध्ये ही गुंतवणूक केवळ एका ‘क्लासिक’ सीनसाठी करण्यात आली होती. तो सिनेमा म्हणजे साय-फाय विश्वातील मैलाचा दगड मानला जाणारा ‘द मॅट्रिक्स’.

वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती आणि वाचोव्स्की बंधूंनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने सिनेमॅटोग्राफीची व्याख्याच बदलून टाकली. या सिनेमात एक दृश्य आहे जिथे नायक गोळ्यांपासून वाचण्यासाठी हवेत झेपावतो आणि त्या गोळ्या स्लो मोशनमध्ये त्याच्या बाजूने जाताना दिसतात. हा सीन ‘बुलेट टाइम’ इफेक्ट म्हणून जगभर प्रसिद्ध झाला. हे दृश्य इतके जिवंत वाटावे की जे व्हीएफएक्सच्या माध्यमातूनही शक्य झाले नसते, यासाठी दिग्दर्शकाने चक्क 120 कॅमेरे एका अर्धवर्तुळात लावले होते. कलाकारांच्या प्रत्येक हालचालीचा एक-एक ‘पोज’ अत्यंत बारकाईने रेकॉर्ड करण्यात आला, ज्यामुळे मोठ्या पडद्यावर तो क्षण काळाच्या ओघात गोठल्यासारखा भासला.

या एका सीनसाठी निर्मात्यांनी 9 कोटी रुपये खर्च केले होते, जे त्या काळातील सिनेमा निर्मितीच्या बजेटच्या तुलनेत अवाढव्य होते. कीनू रीव्हज, लॉरेन्स फिशबर्न आणि कॅरी-अ‍ॅन मॉस यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा 1999 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या चार सिनेमांपैकी एक ठरला. ‘द मॅट्रिक्स’ने जगभरात 4200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 8.7 आयएमडीबी रेटिंग असलेला हा सिनेमा आजही तंत्रज्ञान आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत जगभरातील सिनेमा निर्मात्यांसाठी एक पाठ्यपुस्तक मानला जातो. याच सिनेमाने चित्रपटसृष्टीला ‘बुलेट टाइम’ सारखे प्रगत तंत्रज्ञान दिले, ज्याचा वापर आजही अनेक सिनेमांमध्ये केला जातो.