रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला!, रोहित पवार भावुक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती येथे शोकसागरात लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. रोहित पवार यांनीही ट्वीट करत काका अजित पवारांना आदरांजली वाहिली आणि सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसांचे आभार मानले आहेत. रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला, अशा हृदयस्पर्शी भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Photo – अजित पवार अनंतात विलिन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अजित पवार यांचे पुतने आणि खासदार रोहित पवार यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला. अजित पवार नावाच्या या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून लाखोंच्या संख्येने नागरिक विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जमा झाले होते. या सर्व अजित दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.