
अंतराळातील घडामोडी नासा नेहमीच शेअर करत असते. नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने काढलेला असाच एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. खरं म्हणजे हा फोटो 2008 मधील आहे. या फोटोचे खास वैशिष्टय़े म्हणजे हा आकार एखाद्या पक्ष्यासारखा दिसत असला तरी तो पक्षी नसून दोन आकाशगंगाची टक्कर झालेला क्षण आहे. हाच क्षण नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने टिपला आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय सुंदर घटना आहे. नासाने एक्सवर याचा फोटो शेअर केल्याने या फोटोला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.
हा फोटो 18 वर्षे जुना आहे. या फोटोमध्ये ज्या दोन आकाशगंगा दिसत आहेत. त्या 650 दशलक्ष प्रकाश वर्षे जुन्या आहेत. साधारणपणे त्या धनू राशीच्या तारकासमुहात आढळतात. या आकाशगंगेमध्ये खोल अवकाश आणि गुरुत्वाकर्षणाशी संबंधित एक संथ प्रक्रिया यांचा समावेश आहे, जी अजूनही सुरू आहे. फोटोमध्ये पक्ष्याच्या आकारासारखा दिसणारा पक्षी हा दुसरा तिसरा कोणी नसून तो ईएसओ-593-8 सिस्टम आहे. एक गॅलेक्सी दुसऱया गॅलेक्सीतून जात असताना त्याचा आकार पक्ष्याच्या पंखासारखा दिसत आहे. या आकारामुळे आपल्याला अवकाशात तरंगणाऱया पंखांची जोडी पाहत असल्याचा भास होतो. नासाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लाखो वर्षांपासून घडत आहे. यामुळे आपल्याला स्लो मोशन इफेक्ट दिसतो. ईएसओ 593-8 मध्ये दिसणारा हा विलक्षण आकार भरती-ओहोटीच्या म्हणजेच टायडल फोर्सेस नावाच्या घटनेमुळे तयार होतो, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
ज्यावेळी दोन गॅलेक्सी एकमेकांजवळ येतात तेव्हा त्यांच्या आकारात बदल होतो. त्यावेळी ताऱयांची निर्मिती होऊ शकते. या दोन आकाशगंगा कालांतराने एकत्र येऊन एकत्रित विलीन होण्याची शक्यता असते. हबल स्पेस टेलिस्कोपने आकाशातील असंख्य फोटो घेतली आहेत. परंतु, हा फोटो जरा वेगळा ठरतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिजन्सकडून याला चांगली पसंती मिळत आहे. एका यूजरने याला सुंदर म्हटले आहे. तर दुसऱया युजरने याला अद्भूत कला म्हटले आहे.
























































