पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात बॉम्बस्फोटाची धमकी, पंजाबच्या जालंधरमध्ये चार शाळांना मिळाले धमकीचे ई-मेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी जालंधर येथील चार शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. मोदींच्या दौऱ्यामध्ये बॉम्बस्फोट करू, असे या धमकीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली असून मोदींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी हे रविवारी 1 फेब्रुवारी रोजी जालंधर येथे जाणार आहेत. तेथे आदमपूर विमानतळाचे संत गुरू रविदास विमानतळ असे नामकरण करणार असून त्याचवेळी लुधियाना येथील हलवारा विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन करतील. या दौऱ्यात बॉम्बस्फोट होईल, अशा धमकीचा ई-मेल जालंधरच्या केंब्रिज शाळेला प्राप्त झाला आहे. याशिवाय शहरातील इतर तीन शाळांनाही धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. जालंधर  दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे डेरा सचखंड बल्लांचे प्रमुख संत निरंजन दास यांची भेट घेणार आहेत.

काय म्हटले ई-मेलमध्ये?

मोदींच्या दौऱयामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱया ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही गुरू रविदास यांचा पूर्ण आदर करतो. खलिस्तान्यांची बाबा निरंजन दास यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. मात्र, मोदी हे खलिस्तानवाल्यांचे शत्रू आहेत. निज्जरच्या हत्येला जबाबदार कोण आहे? बदला घेणार असून डेरा बल्लां निशाण्यावर आहे, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे.