उत्तरेच्या थंड वाऱ्याने मासळी पळाली; 300 बोटी हात हलवत परतल्या, मच्छीमारांचा लाखोंचा खर्च वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दिवसांपासून उत्तरेकडची थंडी वाढली आहे त्यातच अंगावर शहारे आणणाऱ्या थंड वाऱ्याने तर सर्वांचीच झोप उडवली असून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना त्याचा फटका बसला आहे. उत्तरेच्या या थंड वाऱ्याने समुद्रातील मासळी पळाल्याने ३०० बोटींना हात हलवत परत यावे लागले. त्यामुळे डिझेल व अन्य सामग्रींचा लाखोंचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून खवय्यांना दर्जेदार मासळी मिळणे मुश्कील झाले आहे.

मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाताना एका मच्छीमार बोटीमागे प्रति फेरीमागे बर्फ, डिझेल, १७ कर्मचाऱ्यांसाठी धान्य, पिण्याचे पाणी आदी अनेक गोष्टी सोबत न्यावे लागतात. अरबी समुद्रात उत्तरेकडील वाढत्या थंडगार वादळी वाऱ्याची लहर सुरू झाली. त्यामुळे गारठलेल्या खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली.

मार्केटमध्ये शुकशुकाट

मच्छी मार्केटमध्ये मासळीअभावी सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बाजारात मासळीच येत नसल्याने विकणार काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मासळीची आवक घटल्याने खवय्यांना चांगल्या प्रतीची मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत स्थानिक मच्छीमारांकडून येणाऱ्या दुय्यम प्रतीच्या मासळीवर खवय्यांना समाधान मानावे लागत आहे, तर काहींनी मटण, चिकनकडे आपला मोर्चा वळवला आहे.

  • रिकाम्या हाताने मासेमारी न करताच माघारी परतल्यास आर्थिक नुकसान होईल या भीतीने आणखी थांबून मासेमारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र बारा दिवस उलटूनही मच्छीमारांची झोळी रिकामीच राहिली.
  • रेशन, डिझेल संपुष्टात येऊ लागल्याने शेकडो मच्छीमार बोटी माघारी परतल्या आहेत. काहींना थोडी मासळी मिळाली. मात्र अनेकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले.
  • सुमारे अडीचशे ते तीनशे मच्छीमार बोटी मासळीविना करंजा मच्छीमार बंदरात आल्या आहेत. यामुळे शेकडो मच्छीमारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग संघटनेचे रमेश नाखवा यांनी दिली.