कमिन्स वर्ल्ड कपमधून आऊट! ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; मार्शकडे कर्णधारपद, तीन नवख्या खेळाडूंना थेट वर्ल्ड कपची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन छावणीत खळबळ उडाली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे अखेर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून आऊट झालाय. कमिन्सच्या जागी डावखुरा वेगवान बेन ड्वारशुइसची संघात थेट एंट्री झाली असून, मॅथ्यू शॉर्टलाही गेटआऊट करण्यात आले असून, मॅट रेनशॉला संधी देण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी संघ जाहीर करताच चित्र स्पष्ट केलं. मिचेल मार्शकडे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. तर जेवियर बार्टलेट, कूपर कॉनली आणि मॅथ्यू कुन्हेमन या तीन तरुणांना थेट वर्ल्ड कपचं तिकीट मिळालंय. ऑस्ट्रेलिया ११ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध आपल्या वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे.

तीन नवखे, थेट रणांगणात!

फिरकीपटू मॅथ्यू कुहेमन, अष्टपैलू कूपर कॉनली आणि वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेट या तिघांचंही वर्ल्ड कपमध्ये पदार्पण झालं आहे. विशेष म्हणजे कूपर कॉनलीची निवड अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. मागील १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत तो संघातही नव्हता. टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनिस यांनी आपली जागा वाचवली आहे. मॅक्सवेल-ग्रीनसारखे अनुभवी अष्टपैलू बॅटिंगची धुरा सांभाळतील. गोलंदाजीत जोश हेजलवूड, जेवियर बार्टलेट आणि ड्वारशुइसवर मदार, तर फिरकीत अॅडम झम्पा-नॅथन एलिसची जोडी तगडी आहे.

कमिन्सचा ‘कम बँक’ पुढे ढकलला!

दुखापतीशी झुंज देणारा पॅट कमिन्स पाकिस्तान दौऱ्यावरही नव्हता. तो वर्ल्ड कपआधी फिट होईल, अशी आशा होती; पण ती फोल ठरली. निवड समितीचे प्रमुख टोनी डोडमेडे स्पष्ट म्हणाले, ‘कमिन्सला अजून वेळ लागणार आहे. ड्वारशुइस हा योग्य पर्याय आहे. डावखुरा वेग, जबरदस्त फिल्डिंग आणि खालच्या फळीत उपयुक्त बॅटिंग अशी अष्टपैलू कामगिरी ड्वारशुइस करू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप संघ –

मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, मॅट रेनशॉ, कूपर कॉनली, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, जोश हेजलवूड, बेन ड्वारशुइस, जेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहेमन, अॅडम झम्पा.