
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडाडून टीका केली आहे. भाजपच्या या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची निराशा केली असून, यात सामान्यांच्या हिताचे काहीही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पामध्ये ना सर्वसामान्यांचा उल्लेख, ना त्यांची फिकीर, असंही ते म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत अखिलेश यादव यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
१. अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार कोसळला, यावरूनच या बजेटचे अपयश दिसून येते, असे अखिलेश यादव म्हणाले. त्यांनी उपरोधिकपणे विचारले की, “सवाल हा नाही की शेअर बाजार रविवारी का उघडला, तर तो अजून किती खाली पडेल हा आहे.”
२. अखिलेश यादव यांनी भाजपच्या अर्थसंकल्पाला ‘१/२०’ (एक छेद वीस) असे संबोधले. त्यांच्या मते, हे बजेट केवळ देशातील ५ टक्के श्रीमंत लोकांसाठी असून उर्वरित ९५ टक्के लोकांसाठी यात काहीही नाही.
३. भाजपचा अर्थसंकल्प म्हणजे त्यांच्या कमिशनसाठी आणि स्वतःच्या लोकांना सेट करण्यासाठी बनवलेला असतो. हे बजेट म्हणजे भाजपच्या भ्रष्टाचाराची ‘अदृश्य खातेवही’ असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
४. देशात प्रचंड महागाई असतानाही सामान्य जनतेला प्राप्तिकरात (Income Tax) कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. याला त्यांनी ‘कर-शोषण’ असे म्हटले आहे.
५. श्रीमंतांच्या व्यवसायासाठी आणि फिरण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या आहेत, मात्र बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांची आणि गरिबांची ‘आशेची थाळी’ आजही रिकामीच आहे, असे यांनी नमूद केले.

























































