T20 WC 2026 – पाकिस्तानवर बंदीची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानविरुद्ध सामना न खेळण्याचा पाकिस्तानचा हट्ट त्यांना चांगलाच महागात पडू शकतो. पीसीबीने इतर क्रिकेट मंडळांप्रमाणेच आयसीसीसोबत सदस्य सहभाग करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि हा करार कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक आहे. त्यामुळे स्पर्धा किंवा एखाद्या सामन्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे थेट आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन ठरते. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. केवळ पीसीबीवर कठोर निर्बंधच नव्हे, तर प्रसारण कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी खटले दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे.

हिंदुस्थानपाकिस्तान सामन्याचे आर्थिक गणित

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि सर्वाधिक कमाई करणारा इव्हेंट मानला जातो. एका क्रीडा अहवालानुसार, केवळ या एका सामन्यावर जवळपास 348 कोटी रुपयांची उलाढाल जाहिरात, ब्रँडेड कार्यक्रम आणि प्रायोजकत्वातून होते. पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे प्रसारण कंपन्या थेट पीसीबीवर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करू शकतात. अशा परिस्थितीत पीसीबी आर्थिक संकटात सापडले जाऊ शकते.

T20 WC 2026 – हिंदुस्थानच्या लढतीवर पाकिस्तानचा बहिष्कार, बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी सरकारचा निर्णय

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागणार

आयसीसी पाकिस्तानवर विविध प्रकारचे निर्बंध लादू शकते. त्यात पाकिस्तानसोबत होणाऱया सर्व द्विपक्षीय मालिकांवर बंदी म्हणजेच कोणताही देश पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडूंना खेळण्यावरही अप्रत्यक्ष बंदी येऊ शकते, कारण त्यांना आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही. याशिवाय पाकिस्तानला आशिया चषकातूनही बाहेर राहावे लागू शकते. महत्त्वाचे म्हणजे पीसीबीचे संपूर्ण आर्थिक गणित आयसीसीकडून मिळणारा महसूल, पाकिस्तान सुपर लीग आणि प्रसारण हक्कांवरच अवलंबून आहे. त्यामुळे आयसीसीशी संघर्ष ओढवून पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱहाड मारली आहे.