रायगड जिल्ह्यात महायुतीत बिघाडी; भाजप, शिंदे, अजित पवार गटाच्या उमेदवारांचा एकमेकांसमोर शड्डू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ५९ गटांमध्ये १७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. दरम्यान महायुतीत अनेक तालुक्यांत बिघाडी झाली असून भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असूनही या तिन्ही पक्षांचे नेते निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरसे आणि घोसाळे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नितीन वारंगे आणि संचिता फुलारे तसेच धाटाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुप्रिया वारंगे आणि घोसाळे पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन फुलारे यांनी आज मतदारसंघात प्रचारफेरी काढली. रोठ बुद्रुक, लांढर, तळाघर, बोरघर, वाशी गावातील प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन नितीन वारंगे व सुप्रिया वारंगे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. तर संचिता फुलारे आणि सचिन फुलारे यांनी तालुका संपर्कप्रमुख शैलेश फुलारे यांच्या नेतृत्वाखाली घोसाळे, विरझोली, कवलठे, कांटी, हाळ, तांबडी या भागात रॅली काढली.

शिंदे गट ४०, भाजप ३० तर अजित पवार गटाचे २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ५९ जागांपैकी बहुसंख्य जागांवर महायुतीमध्ये घटकपक्ष एकमेकांसमोर लढत आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने १९, शेतकरी कामगार पक्ष १९, काँग्रेस पक्षाने ९, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. तर २२ अपक्ष उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत.

उरण येथे मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने बाईक रॅली काढली. उरण तालुका निवडणूक अधिकारी आविशकुमार सोनोने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम व स्वीप पथकप्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शेवा गावातून बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीचा शुभारंभ निवडणूक निर्णय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार डॉ. उद्धव कदम, निर्मला घरत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या बाईक रॅलीत निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर

तळा – पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गटात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. बोरघर हवेली पंचायत समिती गणात शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार रिंगणात असतानाही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. बोरघर हवेली पंचायत समिती गणात अनंत खराडे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.