…तर अजितदादांचा त्यांच्यावर विश्वास नसेल, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची हवाच काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी गेल्या 4 महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता, असा दावा केला होता. हा दावा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, असा सवाल केला होता. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही भाष्य करत फडणवीस यांच्या दाव्याची हवा काढली. अजितदादांनी जर फडणवीस यांच्याशी चर्चा केली नसेल तर त्यांचा त्यांच्यावर विश्वास नसेल, असे दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, अजितदादांचा पक्ष हा आता पवार-पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो गोयल, पटेल, पारेख, शहा, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजितदादांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. तो मूळ पक्ष शरद पवारांचा होता. अमित शहांनी डाका टाकून त्यांच्या हातात दिला आणि स्वत:चे लेबल त्या पक्षाला लावले. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपने गिळून टाकला. याबद्दल जर त्या पक्षातील मराठी आमदारांना, खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वत:ला मराठी समजू नये, ही आमची भूमिका आहे.

अजित पवार यांनी भाजपच्या अजेंड्यावर काम केले नाही. त्यांच्यावर काही संकटं भाजपने लादली. घोटाळ्याचे आरोप झाले. ईडी-सीबीआय मागे लावले त्यामुळे इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केले आणि तेवढ्यापुरते ते भाजपला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फाईल्स त्यांनी क्लियर करून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते त्यांच्या मुळ प्रवाहात परतण्याची घडपड करत होते. ती धडपड करत असतात किंवा त्याआधी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘हिंदू-मुसलमान’, ‘दंगली’, ‘एक है तो सेफ है’ या भाजपच्या अजेंड्यावर काम केले नाही. त्यांनी जातीपातीचे राजकारण केले नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, असे राऊत म्हणाले.

15 जानेवारीला अजितदादांनी भाजपच्या घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असल्याचे म्हटले अन् पुढच्या 10 दिवसात विमान अपघात झाला! – संजय राऊत

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असे नाही ना. अजित पवार स्वत: त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीने भाजप बरोबर गेले आणि त्यांना असे वाटले की, भाजप आपल्या महाराष्ट्राच्या विचारांचा पक्ष नाही. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल तर त्यांचा त्यांच्यावर विश्वास नसेल. जर त्यांना आपल्या स्वगृही परत जायचे असेल, तर त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करायची गरज काय?

फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे. त्यांचा पक्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे. अशावेळी अजित पवारांसारखे नेते या भूमिकेवर काम करू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमच्याही चर्चा होत होत्या. त्यामुळे त्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा का केली नाही यावर फडणवीसांनी आत्मचिंतन करावे,  इतर शंभर लोक बोलताहेत ते खोटे आणि फडणवीस म्हणाताहेत ते खरे. हे चुकीचे आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहात येण्याच्या विचारांशी ठाम होते, दोन्ही पक्षात त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहिती होते. फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाही म्हणून त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नये, असेही राऊत म्हणाले.

अजितदादा भाजपला सांगितल्याशिवाय एकत्रीकरणाची चर्चा करतील का? फडणवीसांचा सवाल