मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. 91 ची निवडणूक वादात, शिंदे गटाच्या सगुण नाईक यांच्या निवडीला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रूझ पूर्वे प्रभाग क्र. 91 मधील निवडणूक न्यायालयाच्या कचाटय़ात सापडली आहे. या प्रभागातून निवडून आलेले शिंदे गटाचे सगुण नाईक यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक यंत्रणेची फसवणूक केली, असा गंभीर आरोप करीत शिवसेनेचे उमेदवार कृष्णा म्हाडगुत यांनी कुर्ला लघुवाद न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. नाईक यांच्या निवडीला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.

मुंबई पालिकेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. याअंतर्गत मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील सावळागोंधळ समोर आला. प्रभाग क्र. 91 मधील शिंदे गटाचे उमेदवार सगुण नाईक यांच्या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेचे उमेदवार कृष्णा म्हाडगुत यांनी ऍड. दिलीप साटले यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. प्रभाग क्र. 91 इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. नाईक यांनी स्वतःची जात ‘भंडारी’ असल्याचा दावा करून 2017 मध्ये पालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या जातदाव्याला जात पडताळणी समितीने 2018 मध्ये अवैध ठरवले होते. समितीच्या त्या निर्णयाला उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला होता. त्यानुसार पालिका सभागृहात नाईक यांचे पालिका सदस्यत्व रद्द केले गेले होते याकडे याचिकेद्वारे न्यायालयाचे लक्ष वेधले. नाईक यांनी यंदाही आवश्यक जात वैधता प्रमाणपत्राशिवाय आणि पूर्वीचा प्रतिकूल आदेश लपवून निवडणूक लढवली, असा आरोप म्हाडगुत यांनी याचिकेत केला आहे.

आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर

सगुण नाईक यांचा नामनिर्देशन अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेल्याचा दावा कृष्णा म्हाडगुत यांनी केला आहे. प्रभाग क्र. 91 मधील निवडणुकीतील नियमबाह्य प्रक्रियेचा निवडणुकीच्या निकालावर थेट आणि भौतिक परिणाम आहे. येथील निवडणूक कायद्याच्या विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे. आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न याचिकेतून उपस्थित केले आहेत.