जलजीवन मिशनचा निधी गेला कुठे? शिवसेनेने राज्यसभेत सरकारला धारेवर धरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक राज्याला केंद्र सरकारकडून निधी मिळतो. मात्र, तेलंगणासह काही राज्यांच्या निधीमध्ये कपात झालेली आहे. महाराष्ट्राला हा निधी मिळालाच नसल्याचा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला आहे. मग जलजीवन मिशनचा निधी नेमका गेला कुठे, असा खरमरीत सवाल करत शिवसेनेने आज राज्यसभेत सरकारला धारेवर धरले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत जलजीवन मिशनच्या निधीतील घोळ, केंद्र व राज्य सरकारमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि या योजनेतून निधी देताना होणाऱया सापत्नभावाच्या मुद्दय़ावरून केंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री सी. आर. पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. महाराष्ट्राला निधी मिळाला आहे का, मिळाला नसल्यास कारण काय, राज्याचे मंत्री महाराष्ट्राला निधी मिळाला नसल्याचे सांगत आहेत, मग नेमकी वस्तुस्थिती काय, अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली. त्यामुळे मंत्री पाटील यांची भंबेरी उडाली. त्यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले. त्याऐवजी जलजीवन मिशन अंतर्गत देशात 16 कोटी नळ जोडण्या दिल्या वगैरे तपशील सांगत वेळ मारून नेली.