
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रचंड दबावाखाली आहेत आणि याच दबावापोटी त्यांनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर (US Trade Deal) स्वाक्षरी केली आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
यादी लोकसभेत राहुल गांधी यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्मण झालं. त्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं. पुढे संसद भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, अदानी प्रकरण आणि ‘एपस्टीन फाइल्स’चा (Epstein Files) उल्लेख करत मोदी सरकारला घेरले.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “गेल्या चार महिन्यांपासून जी व्यापार करार (Trade Deal) रखडला होता आणि ज्यामध्ये काहीही बदल झाला नव्हता, त्यावर मोदीजींनी काल संध्याकाळी अचानक स्वाक्षरी केली. ते कोणाच्या तरी दबावाखाली आहेत, हे मलाही माहित आहे आणि नरेंद्र मोदींनाही माहित आहे.”
पंतप्रधानांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी घाबरलेले आहेत. त्यांच्यावर भयंकर दबाव आहे.” ते म्हणाले, “हजारो कोटी रुपये खर्च करून नरेंद्र मोदींची जी इमेज तयार करण्यात आली आहे, तो फुगा आता फुटू शकतो.”

























































