Mumbai Pune Expressway Traffic Jam – वाहतूक सुरळीत व्हायला आणखी चार तास लागणार! पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी चार तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 तासांहून अधिक वेळ झाला मात्र, वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे टोलच्या माध्यमातून पैशांची लुटू सुरू आहे. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही गॅस शिल्लक असून आणखी दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला मोकळा श्वास घेण्यासाठी रात्रीचे दहा वाजण्याची शक्यता आहे.

घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी माहिती दिली की, “केमिकल कंपाउंडचा वापर करून लिकेज बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आला आहे. मात्र, 100 टक्के लिकेज कमी करण्यात यश आलं नाही. त्यामुळे दुसरा टप्पा म्हणून रिकाम्या टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधून गॅस होस्ट पाईपच्या आधारे भरण्यात आलेला आहे. एक टँकर भरून पूर्ण झालेला आहे. दुसरे दोन टँकर आलेले आहेत. ते डिप प्रेशराईज करून टँकर भरण्यात येतील. जसं त्यातलं वजन आणि गॅस कमी होईल. त्यानंतर तो टँकर क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येईल आणि इथून हलवण्यात येईल. त्यानंतर वाहतूक पूर्णपणे सुरू होईल, अशी माहिती माध्यामांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.