
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ ‘ब’मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका रुपाली भगत यांच्या पदाला बेलापूर न्यायालयाने येत्या १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. रुपाली यांचे पती किस्मत भगत यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
रुपाली भगत या नेरुळ येथील प्रभाग क्रमांक २३ ‘ब’मधून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या अश्विनी माने यांनी निवडणूक लढवली होती. रुपाली यांचे पती किस्मत भगत यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी माने यांनी बेलापूर येथील दिवानी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर के. एन. फटांगरे यांनी रुपाली यांच्या पदाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झालेले असतानाच बेलापूर न्यायालयाने दणका दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
- या प्रकरणात न्यायालयाने सर्व प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावली असून ही स्थगिती कायमस्वरूपी का करू नये याबाबत त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या नोटिसीची पुढील सुनावणी येत्या १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
- आज होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत त्यांना मतदान करू द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय पीठासीन अधिकारी घेणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
महापौरांची आज निवड
नवी मुंबई महापालिकेच्या महापौरांची उद्या निवड होणार आहे. त्यासाठी सकाळी ११ वाजता महासभा बोलवण्यात आली आहे. महापौर पदासाठी भाजपने सुजाता पाटील यांना आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपकडे बहुमत असतानाही शिंदे गटाने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीला आव्हान दिले आहे. शिंदे गटाने महापौरपदासाठी सरोज पाटील आणि उपमहापौर पदासाठी आकाश मढवी यांना उमेदवारी दिली आहे.































































