
नरेश जाधव
अनेक योजना आल्या तरी शहापूरवासीयांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी उचलून ते शहापूर तालुक्याला देण्याची योजना आखून त्याचे कामही सुरू झाले. ७० टक्के योजना पूर्णत्वास आली असतानाच त्याचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. वाय टॅपिंगद्वारे पाणीपुरवठा करण्यास जलसंपदा विभागाने ८ वर्षांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र धरणाच्या आऊटलेटमधून बाय टॅपिंग करण्यास याच विभागाने आता हरकत घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे दोनशे कोटी रुपयांचा खर्च वाया जाणार असून ३५६ गावपाड्यांच्या नशिबी पुन्हा पाणीटंचाईच येणार आहे.
२७ दशलक्ष लिटरची विहीर बनवावी लागेल भावली पाणी योजनेवर आतापर्यंत २०० करोड रुपये इतका निधी खर्च झाला आहे. वाय टॅपिंगला विरोध झाल्यास नवीन योजनेसाठी २७ दशलक्ष लिटर क्षमतेची विहीर बनवावी लागेल. शिवाय रोज २७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा झाल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी हा पाण्याचा साठा निर्माण होईल याची शाश्वती नाही. उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची पातळी तळ गाठते. त्यावेळी विहीर कोरडी पडण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यातील माळ पठार, कसारा विभाग, शिरोळ अजनुप विभाग, वाशाळा विभाग, तलवाडा पठार, साकडबाव पठार, डोळखांब विभाग, टाकीपठार, खर्डी व बिरवाडी येथील ९७ गावे आणि २५९ पाड्यांना दरवर्षी डिसेंबर ते मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. शहापूर तालुक्यात पाण्याची धरणे खाली व गाव-पाडे उंच पठारावर असल्याने लिफ्ट पाणी योजना यशस्वी होत नाही. या भागातील कायमची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून गुरुत्वाकर्षण पद्धतीने भावली योजनेला मंजुरी मिळाली.
…तर योजनाच गुंडाळण्याची नामुष्की
जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार वाय टॅपिंग केले नाही तर जॅकवेल बनवून केलेली योजना गुंडाळावी लागणार आहे. दरम्यान यासंदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती सुमित म्हात्रे यांनी दिली.
- ठाणे जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन अंतर्गत बनवलेल्या १०१ पाणी योजनांचा पाण्याचा स्त्रोत भावली धरणातूनच आहे. तरीदेखील जलसंपदा विभागाने वाय टॅपिंगला हरकत घेतली आहे.
- वाय टॅपिंग करून शहापूरला पाणी दिल्यास ऊर्जानिर्मितीस बाधा येईल, अशी सबब पुढे केली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मात्र ऊर्जानिर्मितीस अडथळा येणार नाही असा दावा केला आहे.






























































