
बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ड्रग्ज तस्करांविरोधात पोलीस व महापालिका प्रशासनाने नालासोपाऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन करून मोठी कारवाई केली. बुधवारी सकाळपासूनच ही कारवाई सुरू असून आतापर्यंत शेकडो नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वसई-विरारमध्ये गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक गुन्ह्यांत नायजेरियन नागरिकांचा समावेश आढळून येत आहे. अमली पदार्थांचे व्यवहार व इतर गैरप्रकारात त्यांचा सहभाग असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे
नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर, आगरवाल, पाश्चिमेला हनुमाननगर यांसह इतर ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे. ड्रग्ज तस्कर आणि त्यांच्या दादागिरीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या व त्याठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस नायजेरियन नागरिकांची संख्या वाढत आहे. काही नायजेरियन नागरिक हे विनापारपत्र, विनाव्हिसा बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. तर काहींनी इमारतीमध्ये कब्जा मिळवत विनापरवानगी व्यवसाय सुरू केले होते. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून पोलीस व महापालिका यांनी संयुक्त कारवाई सुरू केली.
बेकायदा दुकाने थाटली
नालासोपारा गुमास्ता परवान्याशिवाय नायजेरियन लोक ४० दुकाने चालवत होते. तसेच इमारतींमध्ये काही जागांवर त्यांनी कब्जा मिळवला होता. नागरिकांना याचा त्रास होत असून अशा बऱ्याच तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने बुधवारी पोलीस प्रशासन आणि वसई-विरार महापालिका मिळून संयुक्त कारवाई करत आहोत. या कारवाई अंतर्गत या लोकांच्या घराची झडती घेणे, पारपत्र, व्हिसा तपासणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १०९ विविध देशांतील नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ २ – पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी दिली.






























































