
महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल, अशी पतंगबाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहाच दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी केली होती. मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने मुख्यमंत्र्यांनी उडविलेली ही पतंगच कापली गेली. एक गॅस टँकर उलटल्याने या महामार्गावर तब्बल 24 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ही कोंडी लवकर सोडविण्याचा आणि त्यात अडकलेल्या नागरिकांची लवकर सुटका करण्याचा कुठलाच उपाय, पर्याय ‘हतबल’ सरकारकडे नव्हता. हा म्हणे या मंडळींचा ‘गतिमान’ महाराष्ट्र!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी जे काही घडले त्याने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली. आपल्या राजवटीत महाराष्ट्राचा कसा कायापालट होत आहे, पायाभूत विकासाने कशी गती पकडली आहे, महाराष्ट्र गतिमान झाला आहे, अशा वल्गना सत्ताधारी उठता-बसता करीत असतात. त्या वल्गनांचा फुगा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीने फोडला. सुमारे 32 तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल 30 किलोमीटरच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या. ही कोंडी कशीबशी दूर होऊन वाहन चालक मोकळा श्वास घेत नाहीत तोच लोणावळय़ात सिमेंट कंटेनर बंद पडल्याने गुरुवारीदेखील वाहतुकीचे बारा वाजले. तळेगाव ते मळवलीदरम्यान हा कंटेनर रस्त्याच्या मधेच बंद पडला. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली. ती सुरळीत व्हायला पुन्हा काही तास लागले. त्यामुळे नागरिकांचे सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड हाल झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी एक गॅस टँकर उलटल्याने झाली. या टँकरमधील गॅस अत्यंत धोकादायक आणि ज्वलनशील असल्याने तो धोका दूर करायला वेळ लागला, हे सगळे ठीक आहे. मात्र त्यामुळे 24 तास अन्नपाण्याशिवाय
रखडपट्टी झालेल्या
सामान्यांचे काय? मुंबई-पुणे प्रवास वेगवान आणि सुखकर व्हावा यासाठी शिवसेनाप्रमुखांनी या एक्स्प्रेस वेचे स्वप्न एका दूरदृष्टीने पाहिले होते. त्यांनी हे काम त्या वेळी अग्रक्रमाने करून घेतले, परंतु मधल्या अडीच दशकांत या द्रुतगती महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक, वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. या सर्व गोष्टींचा विचार आणि नियोजन सरकारने खूप आधीच करायला हवे होते. ते झाले नाही म्हणूनच मंगळवारची स्थिती उद्भवली. सध्याचे राज्यकर्ते गतिमान विकासाचे आणि वेगवान कारभाराचे बुडबुडे नेहमीच सोडत असतात. अटल सेतू, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा ‘गतिमान’ विकासाच्या बाता मारीत असतात. ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी आणखी कसा कमी होईल, वाहतूक कोंडी कशी होणार नाही, असे तारे तोडत असतात. ते होईल तेव्हा होईल, पण एक्स्प्रेस वेवर वारंवार होणाऱ्या कोंडीचे काय? सरकारकडे त्याचे काय पर्यायी नियोजन आहे? आता म्हणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. हा
‘बैल गेला झोपा केला’
अशातला प्रकार झाला. शिवाय ज्या ‘मिसिंग लिंक’चे गोडवे ही मंडळी सध्या गात असतात, तो मार्ग तरी ‘वाहतूक कोंडीमुक्त’ असेल असे ते छातीठोकपणे सांगू शकणार आहेत का? सरकार एकीकडे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, ‘मिसिंग लिंक’च्या टिमक्या वाजवते, पण सध्या असलेल्या महामार्गांवरील वाहतूक कोंडीकडे, त्यावर उपाय असलेल्या पर्यायी मार्गांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास हे कधीकाळी वाहन चालकांचे गुलाबी स्वप्न होते. आज ते ‘काटेरी सत्य’ बनले आहे. कधी वाहतूक कोंडी होईल आणि आपली रखडपट्टी होईल ही भीती बाळगूनच या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची ही दुर्दैवी शोकांतिका आहे. महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल, अशी पतंगबाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहाच दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी केली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने मुख्यमंत्र्यांनी उडविलेला हा पतंगच कापला गेली. एक गॅस टँकर उलटल्याने या महामार्गावर तब्बल 24 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ही कोंडी लवकर सोडविण्याचा आणि त्यात अडकलेल्या नागरिकांची लवकर सुटका करण्याचा कुठलाच उपाय, पर्याय ‘हतबल’ सरकारकडे नव्हता. हा म्हणे या मंडळींचा ‘गतिमान’ महाराष्ट्र!

































































