जागेवरून राडे थांबेनात, लोकलमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा डोळा फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलमधील राडे सुरूच असून जागेवरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने गाडीतून उतरून दगड भिरकावून मारल्याची व त्यात तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली आहे.

निशांत खत्री असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते दादर येथे राहतात. अंधेरी येथून दादरला परतण्यासाठी निशांत यांनी फास्ट लोकल पकडली. या लोकलमध्ये जागेवरून दोन प्रवाशांत वाद झाला. वांद्रे येथे फलाट क्र. 5 वर रात्री अकराच्या सुमारास लोकल आली असता भांडणारा एक प्रवाशी ट्रकमध्ये उतरला आणि त्याने डब्याच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड निशांत यांच्या डोळ्याला लागून ते रक्तबंबाळ झाले. त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी निशांत यांचा जबाब नोंदवून घेतला असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचे सांगण्यात आले.