वांद्रयाच्या हिरे महाविद्यालयात बंदी घातलेल्या कोर्सचे शिक्षण, युवासेनेची उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रय़ाच्या डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाने बंदी घातलेला कोर्स शिकवला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महाविद्यालयाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हिरे महाविद्यालयात अनेक वर्षांपासून इंटिरियर डिझायनिंग हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. मात्र या अभ्यासक्रमाला मणिपूर येथील ‘द संगई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठ अनुदान आयोगाने इंटिरियर डिझायनिंग या अभ्यासक्रमाला परवानगी नाकारली आहे. असे असतानाही हा कोर्स हिरे महाविद्यालयात शिकवला जात आहे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परवानगी नाकारलेल्या इंटिरियर डिझायनिंग अभ्यासक्रमात अजूनही अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना कॉलेजकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र अपात्र ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही युवा सेनेकडून स्पष्ट केले आहे.